Krantijyoti Savitribai Phule Child Care Scheme: निराधार आणि अनाथ मुलांसाठी महाराष्ट्र शासन देत आहे मदतीचा हात! क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत आता या मुलांना दर महिन्याला मिळणार आहेत. तब्बल २ हजार २५० रुपये. शून्य ते १८ वयोगटातील बेघर आणि असुरक्षित बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात एक आशेचा किरण निर्माण होणार आहे.
अनेक गरजू बालकांना या महत्त्वपूर्ण योजनेची माहिती नसल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहत आहेत. परिसरातील नागरिकांनी शासनाला या योजनेबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष आहेत. अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच, अनाथ, बेघर किंवा दोन्ही पालक नसलेली मुले यासाठी पात्र असतील.
या योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत सोपे आहे. इच्छुक लाभार्थी संबंधित बाल विकास विभागात किंवा अधिकृत संस्थेशी संपर्क साधून अर्ज करू शकतात. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी शासकीय विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अनाथ आणि निराधार मुलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे या मुलांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडून येतील.”
या योजनेचे खालीलप्रमाणे अनेक फायदे आहेत
- प्रत्येक महिन्याला मिळणारी २ हजार २५० रुपयांची मदत मुलांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास सहाय्यक ठरेल.
- या योजनेमुळे मुलांची संस्थात्मक तसेच कौटुंबिक वातावरणात योग्य काळजी घेतली जाईल.
- मुलांना शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होईल.
- त्यांच्या आरोग्याची देखील योग्य काळजी घेतली जाईल.
तरी, जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचावी आणि त्यांना याचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने व्यापक स्तरावर जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे