दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळले, ती सर्व केंद्रे कायमची बंद करण्यात येणार आहेत. त्याचसोबत, कमी पटसंख्या असलेली परीक्षा केंद्रेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंडळाने परीक्षा केंद्र व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, गेल्या पाच वर्षांत गैरप्रकारांसाठी ओळखल्या गेलेल्या परीक्षा केंद्रांवरील संचालक आणि कर्मचाऱ्यांची अदलाबदल केली जाईल. त्यांच्या जागी इतर शाळांमधील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.
परीक्षांमध्ये गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या किंवा त्यात सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जातील. तसेच, संवेदनशील केंद्रांवर ड्रोनच्या मदतीने चित्रीकरण केले जाणार आहे, जेणेकरून गैरप्रकारांवर प्रभावीपणे लक्ष ठेवता येईल.
हा निर्णय परीक्षांमध्ये शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा असला तरी, याचे काही दुष्परिणामही समोर येऊ शकतात. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण यामुळे त्यांना परीक्षेसाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, मंडळाच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय भविष्यात परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे
