मुंबई, 11 ऑक्टोंबर 2021: देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील 13 संच सद्यस्थितीत बंद पडलेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडलाय. केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली आणि पंजाब मध्ये देखील अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यापाठोपाठ आता राज्यावर देखील वीज टंचाईचं संकट ओढवलं आहे.
देशभरात कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळं गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत आणि अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विजेची तूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प हे पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर हीच परिस्थिती राहिली शहरी आणि ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागणार आहे. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केलं आहे.
राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेय.
औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 13 संच कोळशाअभावी बंद
यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी 210 मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) 640 मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे