Agriculture Department Action on FAKE Fertilizer Seed Fraud: खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कृषी विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. बनावट खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी धडक मोहीम राबवली असून, यात गंभीर अनियमितता आढळलेल्या दहा वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये दिलासा मिळाला आहे.
निलंबित केलेल्या परवान्यांमध्ये पाच खतांचे, एक कीटकनाशकाचा आणि चार बियाणांच्या परवान्यांचा समावेश आहे. ही कारवाई कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगमपत्राचा समावेश नसणे, ठरलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करणे आणि नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण न करणे अशा विविध कारणांमुळे करण्यात आली आहे.
जिल्हा भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत, शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील एका खत कंपनीवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कंपनीचा ७.७८ लाख रुपये किमतीचा ४३.९५५ टन खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी ही माहिती दिली आहे.
या कारवाईमुळे कृषी निविष्ठांच्या विक्रीतील गैरप्रकारांना आळा बसणार असून, शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार खते आणि बियाणे पोहोचतील अशी अपेक्षा आहे. खरीप हंगाम जवळ येत असताना, अशा प्रकारची कठोर कारवाई शेतकऱ्यांच्या हिताची असून, त्यांना योग्य आणि प्रमाणित उत्पादने मिळण्यास मदत करेल.
कृषी विभागाने ही मोहीम यापुढेही सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बनावटगिरी करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहिल्यास शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल आणि त्यांना चांगल्या उत्पादनांची हमी मिळेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































