चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

मुंबई, दि. २४ जुलै २०२०: राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते दहावी या शिक्षण अभ्यासक्रमासाठी युट्युब वर चार नवीन चॅनेल बनवले असल्याचे ट्विटरद्वारे जाहीर केले. असे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्याच बरोबर लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा युट्यूब चॅनेल सुरु होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. इयत्ता तिसरी ते बारावीसाठी आता जिओ टीव्हीवर एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत”.

वर्षा गायकवाड यांनी याआधी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहिर केलं होते. आता बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

असे आहे वेळापत्रक :

१) पूर्व प्राथमिक (बालवाडी) – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

२) पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिटे विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर उर्वरित १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे.

३) तिसरी ते आठवी – या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतले जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे.

४) नववी ते बारावी – या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांची चार सत्रे असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा