महाराष्ट्र कर्नाटक वाद; एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शहांशी चर्चा

मुंबई, ८ डिसेंबर २०२२: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर झालेल्या हिंसाचारावर विरोधकांच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर बोलून हस्तक्षेप करण्याची विनंती केली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांच्या निदर्शनांमुळे संसदेतही सीमा तणावाचे पडसाद उमटले. लोकसभेत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

फडणवीस म्हणाले, मी अमित शहा यांच्याशी फोनवर बोलून त्यांना परिस्थितीची माहिती दिली. महाराष्ट्राच्या वाहनांवर विनाकारण हल्ला करणे योग्य नाही, असे मी म्हणालो. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी देखील माझे बोलणे झाले आहे, त्यांनी मला आश्वासित केले आहे. मी गृहमंत्र्यांना विनंती केली आहे, की त्यांनीही यामध्ये लक्ष घालावे आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावे की अशाप्रकारे दोन्ही राज्यांमध्ये एकमेकांच्या गाड्यांवर हल्ले होणे अतिशय चुकीचे आहे, त्यामुळे त्यांनी ते तत्काळ थांबवावे, असे त्यांना सांगावे, अशी विनंती मी अमित शाह यांना केली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर बसवराज बोम्मई यांच्याशीही बोललो असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, एसटी,गाड्यांची तोडफोड करणा-यांवर कठोर कारवाईचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असेपर्यंत दोन्ही राज्यातील जनतेला त्रास होवू नये, अशी आमची चर्चा झाली.

दरम्यान, सीमा वादावरील एससी खटल्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यापासून भाजपशासित दोन राज्यांमधील तणाव वाढला आहे. कर्नाटकात एप्रिल-मे २०२३ मध्ये विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. कर्नाटकचे गृहमंत्री अर्गा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी सांगितले की, कर्नाटक महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यकर्त्याला बेळगावीमध्ये प्रक्षोभक विधान करू देणार नाही. ज्ञानेंद्र यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार हे येत्या ४८ तासांत बेळगावला जाऊन कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे सांगितले.

तत्पूर्वी, बेळगावी जिल्ह्याचे जलसंपदा आणि प्रभारी मंत्री गोविंद करजोल म्हणाले होते की, महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की सर्व राज्ये संघराज्याच्या अंतर्गत आहेत आणि त्यांनी सर्व पक्षांचा आदर केला पाहिजे. कर्नाटक आपल्या जमिनीचा एक इंचही बळी देणार नसल्याचे म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा