पुणे : ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची रविवारच्या सकाळच्या सत्रात ७० व ८६ किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीसाठी स्पर्धा पार पडली.
म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत हे अतीतटीचे सामने रंगले होते. रविवारी झालेल्या सामन्यात सोलापूरच्या प्रशांत जगतापने ८६ किलो व कोल्हापूर शहराचा नितिन पवार याने ७० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
रविवारी ७० व ८६ किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीसाथीचे सामने पार पडले. यात ८६ किलो वजनी गट- माती विभागात सोलापूरच्या प्रशांत जगताप याने अहमदनगरच्या आकाश भिंगारेला ८-२ गुणांनी पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले. प्रशांत याने अवघ्या वयाच्या २२ व्या वर्षी प्रथमच महाराष्ट्र केसरी वजनी गट स्पर्धेतीत सहभागी झाला आहे. आणि पहिल्याच वर्षी सुवर्णपदकावर त्याने आपली मोहर उमटविली आहे.
सोलापूर जिल्हयातल्या कुंभारगाव येथील हा पहिलवान वस्ताद अमृत मामा भोसले यांच्या तालमीत तयार झाला आहे. तसेच पुण्याच्या संतोष पडळकरने सांगलीच्या रणजीत पवारला १०-० ने हरवत कांस्य पदकावर मोहर उमटवली आहे.
अंतिम ७० किलो वजनी गटात माती विभागात कोल्हापूर शहरचा पहिलवान नितिन पवार व कोल्हापूर जिल्ह्यातील मच्छिंद्र निवंगरे यांच्यात अत्यंत चुरशीची व अतीतटीची लढत झाली. दोघांनीही ४-४ गुण मिळविले.
मात्र नियमांनुसार निर्धारित वेळेतील अंतिम गुण हा नितिन पवार याने पटकाविल्याने त्याला विजेता घोषित करण्यात आले. आणि तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
नितिन पवारने यापूर्वी २०१७च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले होते. महाराष्ट्र केसरी वजनी गटातील ही त्याची पाचवी स्पर्धा आहे. वस्ताद कृष्णात पाटील यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील संतोष गावडे याने उस्मानाबादच्या लक्ष्मण जाधवला २-१ च्या फरकाने हरवत कांस्य पदक जिंकले.
अंतिम निकाल –
७० किलो माती विभाग
सुवर्ण- नितिन पवार (कोल्हापूर शहर)
रौप्य – मच्छिंद्र निवंगरे (कोल्हापूर जिल्हा)
कांस्य- संतोष गावडे (सोलापूर)
८६ किलो वजनी गट माती विभाग
सुवर्ण – प्रशांत जगताप (सोलापूर)
रौप्य- आकाश भिंगारे (अहमदनगर)
कांस्य – संतोष पडळकर (पुणे)