Maval ZP Election 2025: BJP vs NCP face off: पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून, नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेमुळे मावळ तालुक्यात राजकीय धुमाकूळ पुन्हा नव्या जोमाने पाहायला मिळणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी (१४ जुलै, २०२५) जाहीर केलेल्या या रचनेनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०२२ पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषदेचे ५ गट आणि पंचायत समितीचे १० गण कायम ठेवण्यात आले आहेत.
मात्र, वडगाव शहराचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यामुळे त्याला या यादीतून वगळण्यात आले आहे, ज्यामुळे प्रभागांमध्ये मोठा भौगोलिक फेरफार झाला आहे. गेल्या काही निवडणुकांपासून मावळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट आणि अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील सामाजिक आणि राजकीय नेतृत्व याच दोन पक्षांभोवती फिरत असल्याने, नवीन प्रभाग रचनेमुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी, सामाजिक समीकरणे आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर मोठे परिणाम होणार आहेत.
बदलणार राजकीय गणिते
प्रत्येक गटात दोन गणांचा समावेश असल्याने, त्या-त्या भागातील ग्रामपंचायतींवर प्रभुत्व असणाऱ्या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. विशेषतः सोमाटणे, काले आणि कार्ला गटांमध्ये स्थानिक राजकीय व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव मोठा असल्याने, या गटांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रारूप रचनेनुसार गट व गण खालीलप्रमाणे;
- टाकवे बु. गट: टाकवे बु. व वडेश्वर
- इंदोरी गट: इंदोरी व वराळे
- खडकाळे गट: खडकाळे व कार्ला
- कुसगाव बु. गट: कुसगाव बु. व काले
- सोमाटणे गट: सोमाटणे व चांदखेड
नव्या प्रभाग रचनेनंतर मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्याची नाही, तर मावळातील अनेक नेतेमंडळींच्या राजकीय भवितव्याचा निर्णायक क्षण ठरणार आहे. प्रत्येक गटात कोणत्या गावातील मतांची विभागणी झाली आहे, याचा अभ्यास आता पक्षांनी सुरू केला असून, या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































