Pimpri Government Housing Scam: ‘सरकारी घर मिळवून देतो’ असे सांगून पिंपरीतील एका महिलेसह अनेकांना तब्बल ४६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जुलै २०२४ पासून सुरू असलेल्या या फसवणुकीत दोन महिला आरोपींसह एकूण पाच जणांचा समावेश आहे. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
पिंपरीतील राजवीर बिल्डिंग, अण्णासाहेब मगर स्टेडिअमजवळ राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने शुक्रवारी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमाकांत ढाके, शुभम ढाके, दिव्याचा होणारा पती आणि दोन महिला आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीएमआरडीए (PMRDA) मध्ये घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी आणि इतर नागरिकांकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात एकूण ४६ लाख २९ हजार रुपये उकळले. यासाठी आरोपींनी बनावट अर्ज (फॉर्म) आणि शासकीय कागदपत्रांच्या खोट्या प्रती दाखवून लोकांचा विश्वास संपादन केला. या फसवणुकीमुळे पिंपरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शहर परिसरात ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पिंपरी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आणखी कुणाची फसवणूक झाली आहे का, याचा शोध घेत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































