Shiv Sena Poster War; Shinde vs Thackeray Factions Clash: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिंदे यांनी ‘मरे हुए को क्या मारना?’ असे प्रत्युत्तर दिले. या शाब्दिक युद्धानंतर आता पुण्यात ठाकरे आणि शिंदे गटाच्या शहरप्रमुखांमध्ये पोस्टरबाजीचे युद्ध सुरू झाले आहे, ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.
शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी शहरातील प्रमुख ठिकाणी लावलेल्या भव्य पोस्टर्समध्ये उद्धव ठाकरे यांना कुबडी आणि ऑक्सिजनच्या टँकसोबत दाखवले आहे, ज्यावर काँग्रेसचे चिन्ह आहे. यातून काँग्रेसच्या पाठिंब्यावरच ठाकरे गट तग धरून असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याउलट, एकनाथ शिंदे यांना भगवा ध्वज आणि धनुष्यबाणासह दाखवून त्यांनी पक्ष, चिन्ह आणि हिंदुत्व जपल्याचे दर्शवले आहे. या पोस्टरमुळे ठाकरे गटाला डिवचण्यात आले आहे.
याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनीही शहरातील प्रमुख चौकांत पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या पाया पडताना आशीर्वाद घेताना दिसत आहेत. दुसऱ्या व्यंगचित्रात शिंदे ‘झुकेगा मैं…’ म्हणत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे मार्ग दाखवत असल्याचे चित्रण आहे. या पोस्टरवर ‘निष्ठेचे विचार सोडून सत्तेसाठी एक लाचार’ असा आशय नमूद करण्यात आला आहे, ज्यामुळे दोन्ही गटांतील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे
