पुणे २३ जुलै २०२३: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) स्पर्धेची सुरुवात धुमधडाक्यात झाली. तब्बल २८००० हून अधिक प्रेक्षकांनी, पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स या सामन्यासाठी हजेरी लावली. या स्पर्धेची विशेष गोष्ट म्हणजे, सुरुवातीच्या समारंभात पूर्व भारतीय महिला क्रिकेटपटूंचा सन्मान करण्यात आला. क्रिकेटमध्ये ग्लॅमर, स्टारडम व टीआरपी हा पुरुष क्रिकेटकडे असल्यामुळे महिला क्रिकेट व त्याचा इतिहास आजवर झाकोळला गेलाय. या स्पर्धेच्या निमित्ताने महिला क्रिकेट आणि खेळाडूंना सन्मान व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
एमसीएने महिला क्रिकेट इतिहासाला उजाळा देत, सर्वात पहिल्या महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाचा सत्कार यावेळी केला. यात शामा लुंकड, निलिमा बर्वे-जोगळेकर, कल्पना परोपकारी-तापिकर, राजेश्वरी दिवडकर, माधुरी निकम-सावंत, विजया पवार-पाटील, उज्वला निकम-पवार या महिला खेळाडूंचा समावेश होता. त्या काळात महिलांनी क्रिकेट खेळणे हीच मुळात एक क्रांतिकारी गोष्ट होती.
आज भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचा उंचावलेला आलेख, त्यामुळे त्याला मिळणारी प्रेक्षकांची पसंती, बीसीसीआयचे महिला क्रिकेटर्सला मिळणारे प्रोत्साहन यामुळे टीव्ही ब्रॉडकास्टर्सही आता महिला क्रिकेटला गांभीर्याने घेऊ लागले आहेत. पण भारतीय महिला क्रिकेटला कायमच सुगीचे दिवस नव्हते. भारतीय महिला क्रिकेटने अतिशय खडतर काळातून प्रवास केलाय. आपल्या वाटेत आलेल्या सर्व अडथळ्यांना क्लीन बोल्ड करत आज त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
“महिला क्रिकेटच्या खडतर प्रवासाच्या साक्षीदार असलेल्या आम्हा खेळाडूंना महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सन्मानित केल्यामुळे आम्ही खूप भारावून गेलो आहोत, या क्षणी आमच्या डोळ्यासमोर ५० वर्षांपूर्वीचा काळ उभा राहिला. आमच्या या प्रवासाला व जिद्दीला मान्यता देऊन आम्हाला गौरवान्वित केले या बद्दल आम्ही, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व त्याचे अध्यक्ष श्री.रोहित राजेंद्र पवार यांचे शतशः आभारी आहोत”, अशा भावना यावेळी पूर्व भारतीय महिला खेळाडू निलिमा बर्वे-जोगळेकर यांनी व्यक्त केल्या. त्याच पूर्व भारतीय महिला संघाचा एक भाग असलेल्या कल्पना परोपकारी-तापिकर यावेळी म्हणाल्या की, “महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व त्याचे अध्यक्ष रोहित पवार यांनी एमपीएल हा एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील अनेक नवीन गुणी खेळाडू पुढे येतील”.
एमपीएलमध्ये या हंगामात पुरुषांबरोबर महिलांचे तीन प्रदर्शनी सामने खेळवण्यात येणार असुन पुढील हंगामात एमपीएलमध्ये महिलांचेही संघ दिसतील, ही महिला क्रिकेटसाठी खूप आश्वासक गोष्ट आहे. खडतर काळात सोयीसुविधांचा अभाव असतांनाही, महिला या क्रिकेट खेळत राहिल्या म्हणून महिला-क्रिकेट रुजले व टिकले. पण आज भारतीय महिला-क्रिकेटला सुवर्णकाळ आला आहे, हे पाहून नक्कीच समाधान वाटते.
न्युज अनकट प्रतिनिधी- वैभव शिरकुंडे