उच्चशिक्षण क्षेत्राला धक्का! प्राध्यापकांची भरती रखडल्याने नेट-सेट पात्रताधारकांत निराशा

राज्यातील महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे उच्चशिक्षण क्षेत्रात मोठी निराशा पसरली आहे. सरकारने वारंवार भरतीची घोषणा करूनही अद्याप ठोस निर्णय किंवा शासन आदेश न निघाल्याने नेट, सेट आणि पीएच.डी. धारक उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५,५०० प्राध्यापक आणि २,९०० शिक्षकेतर कर्मचारी भरतीची घोषणा केली होती, पण अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नाही.

यामुळे राज्यातील महाविद्यालयांमधील सुमारे १२ ते १३ हजार पदे रिक्त आहेत, ज्याचा थेट परिणाम अध्यापन कार्यावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. रिक्त जागांवर सीएचबी (CHB) प्राध्यापकांकडून काम करून घेतले जात आहे, पण त्यांनाही पुरेसे मानधन मिळत नसल्याची तक्रार आहे.

या अनास्थेच्या विरोधात महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेने सोमवारी (दि. १५) पुण्यातील उच्चशिक्षण संचालनालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. सरकार केवळ घोषणा करत असल्याचा आरोप करत, येत्या काळात दिवाळीत उपोषण आणि ‘वर्षा’ निवासस्थानासमोर निदर्शने करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

सरकार कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याच्या अफवांनाही जोर चढला असून, यामुळे पात्र उमेदवारांमध्ये आणखीनच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भरती लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी प्राध्यापक करत आहेत, जेणेकरून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकेल आणि उच्चशिक्षणाची गुणवत्ता टिकून राहील.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे