मुंबई, ४ जुलै २०२३ : मागील काही दिवसांपासून राज्यातून महिला गायब होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच बाल लैंगिक शोषणाच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. या सर्व प्रकरणाचे आज विधान परिषदेत पडसाद उमटले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यांवर सखोल माहिती दिली. महिला बेपत्ता झाल्याच नाही पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आज विधान परिषदेत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाली. त्याला देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. सर्वोच्च न्यायालयाने महिला आणि बालके गायब होत असल्याने काही निर्बंध टाकले आहेत. महिला किंवा मुले गायब झाल्यास ७२ तासांत तो एफआयआर करावा लागतो. त्यांना किडनॅप केले किंवा पळवून नेले या दृष्टीने तपास करावा लागतो. त्यातही महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे. बाल लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र १७ वा आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
महिला गायब होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. २०२१ मध्ये परत आलेल्या महिलांची संख्या ८७% ने वाढली आहे. ही संख्या दोन वर्षानी वाढत जाते. २०२२ मध्ये ही संख्या ८०% झाली. जानेवारी ते मे २०२३ मध्ये आातापर्यंत ६३ घटना उघडकीस आल्या आहेत. ही आकडेवारी सुमारे ९०% पर्यंत जाईल. ती भूषणावह नाहीये. मुली परत येण्याची इतर राज्यांपेक्षा आपली टक्केवारी १०% नी जास्त आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.रोज ७० मुली गायब होतात, महाराष्ट्र सुरक्षित नाही, असे चित्र तयार केले जात आहे. पण प्रत्यक्षात वेगळी परिस्थिती आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे मुली घराबाहेर जात असतात. त्याच्या खोलात मी जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या पोलिसांनी केलेली कामगिरी इतर राज्यांहून चांगली आहे. २०२१ साली ९६% बालके सापडली. २०२२ साली ९१% , २०२३ साली ७१% बालके सापडली आहेत. १००% बालके सापडली पाहिजेत. आपल्या पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान मार्फत केलेली कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. केंद्रानेही या मोहिमेचे संसदेत कौतुक केले आहे.
अनेकवेळा आकड्यांवरून आपण कायदा आणि सुव्यवस्थेची चर्चा करतो. मुंबई ही वर्षानुवर्षे इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत महिलांना सुरक्षित वाटते. मुंबईत महिला रात्रीही प्रवास करतात. हे महत्त्वाचे आहे. आपण अनेकवेळा संख्या किंवा आकडे सांगतो. पण महाराष्ट्र गुन्ह्यात तिसरा आहे. विशेष म्हणजे लोकसंख्येत महाराष्ट्र मोठा आहे. दर एक लाख लोकसंख्येमागे गुन्हे किती आहेत हे पाहावे. गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दहावा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ हजार ४९३ गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे, याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर