साहित्यप्रेमी आणि अभ्यासकांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) बहुप्रतीक्षित निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी (दि. २७) परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पंचवार्षिक निवडणुकीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला जाणार आहे. परिषदेची मागील निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. २०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे निवडणुकीची परिस्थिती नसल्याचे कारण देत कार्यकारी मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत पाच वर्षांची मुदतवाढ घेतली होती. मात्र, काही सभासदांनी ही मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप करत या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.
या पार्श्वभूमीवर, परिषदेचे आजीव सभासद राजकुमार भानुदासराव धुरगुडे यांनी विश्वस्त कायदा कलम ४१ (अ) अंतर्गत धर्मादाय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. परिषदेच्या निवडणुका पारदर्शी पद्धतीने आणि कायदेशीर चौकटीत पार पाडाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘मसाप’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी ३ वाजता माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. सभेच्या कामांमध्ये कार्यवृत्त, ताळेबंद आणि अर्थसंकल्प संमत करण्याबरोबरच पंचवार्षिक निवडणुकीचा प्रस्ताव सादर करण्याचा उल्लेख आहे. दरम्यान, सभासद राजकुमार धुरगुडे यांनी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक आयोजनाचा विषय आता न्यायप्रविष्ट झाला असून, बेकायदेशीर कार्यकारिणी शनिवारीच्या अनधिकृत सर्वसाधारण सभेत याचिकेची दखल घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही,’ असे स्पष्ट केले आहे. या सभेकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले असून, ‘मसाप’चा पुढील कारभार निवडणुकीद्वारे निवडलेल्या नव्या कार्यकारिणीकडे जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































