आता एसटी डेपोतच भरा पेट्रोल-डिझेल, उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करण्याचा एसटीचा प्रयत्न

एसटी महामंडळाची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता ‘गेम चेंजर’ निर्णय घेण्यात आला आहे.
आता एसटी डेपोमध्ये केवळ बसच नाही, तर खासगी गाड्यांनाही थेट पेट्रोल-डिझेल मिळणार!

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या दिग्गज कंपन्यांसोबत टायअप करून एसटी महामंडळ आपलेच पंप सर्वसामान्यांसाठी खुले करणार आहे.

आजवर राज्यातील २५१ ठिकाणी असलेले एसटी पंप केवळ बसपुरते मर्यादित होते, पण आता खासगी वाहनचालकांनाही एसटी आगारात घुसून इंधन भरता येणार आहे. पुणे विभागातील १४ आगारांमध्ये ही योजना सुरू करण्याची तयारी सुरू आहे. प्रत्येक पंपासाठी २५ x ३० मीटर जागा खास राखून ठेवण्यात आली आहे.

या निर्णयामुळे एसटीला केवळ इंधन विक्रीतूनच नव्हे, तर या पंपावर उघडणाऱ्या रिटेल दुकाने, सेवा आणि सुविधा यांतूनही मोठा महसूल मिळेल. म्हणजेच प्रवाशांवर तिकीटदराचा बोजा कमी होईल आणि महामंडळाला नवा श्वास मिळेल.पुणे विभागाचे भांडार अधिकारी नितीन आढाव यांनी सांगितले की, यासंदर्भातील अधिकृत पत्र आल्यानंतर अंमलबजावणीला गती दिली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे