शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत! SCERT च्या ऑनलाइन प्रशिक्षणाने वाढवले मनस्ताप

SCERT online training causes
शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत!

SCERT online training causes stress for Maharashtra teachers: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) २ ते १२ जून या कालावधीत आयोजित केलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाने राज्यातील शिक्षकांना अक्षरशः हैराण केले आहे. १२ आणि २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आवश्यक असलेल्या या प्रशिक्षणात प्रत्येक तासिकेनंतर ऑनलाइन उपस्थिती आणि मूल्यांकनाची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, सर्व्हर डाउन आणि लिंक न उघडल्याने शिक्षकांचा बहुतांश वेळ ऑनलाइन कामांमध्येच वाया जात आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शिक्षकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शिस्तीच्या नावाखाली ऑनलाइन अतिरेक आणि सुविधांचा अभाव

प्रत्येक तासाला ऑनलाइन उपस्थिती आणि परीक्षा अनिवार्य केल्याने प्रशिक्षण स्थळावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि तांत्रिक कारणांमुळे प्रशिक्षणात विस्कळीतपणा येत असल्याने, राज्य प्राथमिक शिक्षक संघाने ऑफलाइन मूल्यमापनाची मागणी केली आहे. शिक्षकांकडून प्रत्येकी २ हजार रुपये शुल्क आकारले जात असतानाही, प्रशिक्षणादरम्यान चहा, अल्पोपाहार यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. “प्रशासनाकडून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत एवढी अनास्था का?” असा संतप्त सवाल राज्यभरातील शिक्षक विचारत आहेत.

निवड श्रेणी शिक्षकांसाठी अजूनही दिवास्वप्न ?

एकीकडे शिक्षकांना कठोर वातावरणात हे प्रशिक्षण दिले जात असताना, दुसरीकडे राज्यभरात निवड श्रेणीच्या प्रस्तावांना वर्षानुवर्षे मान्यता मिळत नाही. काही अपवादात्मक जिल्हा परिषदा वगळता, निवड श्रेणी मिळणे हे शिक्षकांसाठी दिवास्वप्न ठरले आहे. या दुहेरी मारामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे