पुणे २८ सप्टेंबर २०२४ : वेरूळ लेणी (Ellora Caves) ही छत्रपती संभाजी नगर शहरापासून ३० कि.मी.अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी या ठिकाणी आहेत आहेत. यामध्ये १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन लेणी आहेत. इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणींचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. येथील कैलास मंदिर स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा (प्रथम) (७५७-७८३) काळात खोदण्यात आले.
राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेल्या भेटीची नोंद सापडते. दहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने येथे भेट दिली होती. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिस्टा, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होती. १९व्या शतकात भारतात ब्रिटीश राजवट असताना वेरुळ दुर्लक्षित होते. आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६०च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणी मोठया प्रमाणावर विकासकामे केलेली आहेत. या ठिकाणी महामंडळाची ८२.०३ एकर इतकी जमिन आहे. या जमिनीवरील ४२.५० एकर भागात महामंडळाने जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्र उभारले असून पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा जसे वाहनतळ, उपहारगृह, स्वच्छतागृह इ. पुरविण्यात आलेल्या आहेत. वनविभागास महामंडळाची जमीन हस्तांतरीत करुन त्या ठिकाणी वनविभागामार्फत पर्यावरण पूरक महादेव वन उभारण्यात आले आहे. दरम्यान, याठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याच्या सोयी मर्यादित असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे महामंडळाने या ठिकाणी ४०१३.२३ चौमी एवढया जागेत अद्ययावत पर्यटक निवासाचे काम केले आहे. २०खोल्या, २डॉरमेट्री, १ उपहारगृह,१ किचन, स्वागतकक्ष यांची उभारणी केली आहे. पर्यटक निवास बांधण्याकरिता ७ कोटी खर्च करण्यात आलेला आहे. सर्व खोल्या या वातानुकूलित असून भव्य असे २ लोकनिवास महिला आणि पुरुषांसाठी तयार करण्यात आले आहेत.
वेरूळ पर्यटक निवास वेरूळ कक्षांची सुविधा–
निवास खोल्यांची संख्या –२०. (वातानुकूलित कक्ष) – क्षमता – ६०
डाॅरमेट्री -२
एका डोरमेट्री क्षेत्रफळ – एकुण लोकक्षमता-३०
उपहारगृह / डायनिंग – १ क्षमता – ८०
किचन – १
भांडारकक्ष, स्वच्छतागृह, अपंगांसाठी स्वच्छतागृह, स्वागतकक्ष, व्यवस्थापक कक्ष.
या पर्यटक निवासाच्या समोरच हेलीपॅड असून जवळच जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्रही आहे. पर्यटक निवासामध्ये विविध सोयी असल्याने पर्यटकांना राहण्याचा आनंद घेता येणार आहे. पर्यटक निवास वेरुळ लेण्यांच्या अगदी समोरील बाजूस असल्याने पर्यटक निवासाच्या खोल्यांमधुन आणि छतावरुन लेण्यांचे विहंगम दृश्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे. या पर्यटक निवासाचे उद्घाटन पर्यटन विभागमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आगामी काळात पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करुन पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यावर पर्यटन विभागाचा भर आहे, असे गिरीष महाजन यांनी या प्रसंगी सांगितले.
पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज आणि व्यवस्थापकिय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आलेल्या राष्ट्रकूट पर्यटक निवासामुळे वेरुळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या आणि घृष्णेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची उत्तम दर्जाची सोय होणार आहे. येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही लेण्याच्या सानिध्यात राहण्याची संधी उपलब्ध होणार असून छत्रपती संभाजीनगर शहरापासुन वेरुळ जवळच असल्याने पर्यटक या ठिकाणी राहण्यास जास्त पसंती देतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांना केले. पर्यटक निवासाचे परिचालन महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : जयश्री बोकील