Maharashtra Transporters Strike: ‘ई-चलन’ प्रणाली वाहतूकदारांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप करत, राज्यातील माल आणि प्रवासी वाहतूकदारांनी बुधवारी (दि. १) मध्यरात्री १२ वाजल्यापासून बेमुदत ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारले आहे. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्सच्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी ही माहिती दिली. या आंदोलनात राज्यातील ३० हून अधिक वाहतूक संघटना सहभागी होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ई-चलन प्रणालीमुळे जबरदस्तीने दंड वसूल केला जात असल्याचे कार्याध्यक्ष गौरव कदम यांनी सांगितले. दंडमाफी, क्लिनर सक्ती रद्द करणे, शहरातील वेळेचे बंधन शिथिल करणे आदी मागण्यांसाठी यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहे. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील वाहतूकदारही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
ई-चलन मशीनचा गैरवापर आणि अनधिकृत कर्मचाऱ्यांच्या वापराबाबत विनोद जगजंपी यांनी गंभीर आक्षेप घेतला. त्यांनी प्रत्येक केससाठी अधिकारी आणि वाहनधारकाचा फोटो, डिजिटल सही अनिवार्य करण्याची मागणी केली. तसेच, २४ तासांत दुसरी केस नोंदवू नये आणि जीपीएस यंत्रणा लागू करावी, असेही ते म्हणाले.
वाहतूकदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने हस्तक्षेप करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































