Village Renamed to ‘Hero Chi Wadi’ as a Tribute to Late Actor Irrfan Khan:
येत्या 4 जुलैला अनुराग बासू यांचा एक नवीन चित्रपट ‘मेट्रो इन दिनो’ रिलीज होत आहे हा चित्रपट, त्यांचा सर्वात गाजलेला ‘लाईफ इन मेट्रो’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात इरफान खान यांनी मॉन्टी नावाची भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाने इरफान खान यांनी मॉन्टी या पात्राला पुरेपूर न्याय दिला होता आणि सर्वांची मन जिंकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बासू यांना इरफान खान यांची कमी मेट्रो इन दिनो च्या सेटवर सातत्याने जाणवत होती. खरंच इरफान खान, एक असा कलाकार ज्याने आपल्या अभिनयाने देश-विदेशात नाव कमावलं पण तुम्हाला माहितीये का की इरफान खान हे एक रिअल लाइफ हिरो देखील होते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक छोटंसं गाव आहे. अभिनेते इरफान खानयांची एक आठवण रहावी म्हणून या गावकऱ्यांनी या गावाचे नाव ‘हीरो ची वाडी’ केले.
इरफानचं गावाशी असलेलं घट्ट नातं;

इरफान खानने इगतपुरीतील या गावात एक फार्महाऊस विकत घेतलं आणि तिथे 15 वर्षं राहिले. गावात आल्या वर इरफान यांनी आजूबाजूच्या गावकऱ्यांशी बोलायला आणि संवाद साधायला सुरुवात केली. तेव्हा यांना गावातल्या परिस्थिती बद्दल जाणीव झाली. गावकरी गरजू असून त्यांना मदतीची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी ठरवलं की, गावाच्या विकासासाठी ते स्वत: पुढाकार घेतील आणि गावकऱ्यांना मदत करतील. गावकऱ्यांसोबत त्याचं नातं इतकं घट्ट होतं की, ते त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यच मानत होते. इरफानने गावकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अनेक पावलं उचलली. त्याने गावाला ॲम्ब्युलन्स दिली, शाळेसाठी पुस्तकं आणि कॉम्प्युटर डोनेट केले. इतकंच नव्हे, तर शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठीही त्याने आर्थिक मदत केली. गावातल्या गावकऱ्यांना ते आपला परिवारच मनात होते गावातल्या मुलांसोबत ते खेळायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे आणि जेवणही एकत्र करायचे आपलं सेलिब्रिटी स्टेटस विसरून ते गावकऱ्यांसोबत सामान्य माणसासारखे रहायचे.
इगतपुरी जिल्हा परिषदेचे सदस्य गोरख बोडके म्हणतात, “जेव्हा-जेव्हा आम्हाला गरज पडली, इरफान आमच्या पाठीशी उभा राहिला.” गावकऱ्यांसाठी इरफान हा एक हिरो होता.
गावकऱ्यांवर एक दुःखाचा डोंगर कोसळला;
इरफान खानयांना 2018 मध्ये न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर (कर्करोग) असल्याचं निदान झालं. त्यावर उपचार देखील सुरू होते पण दुर्दैवाने, 28 एप्रिल 2020 च्या रात्री, त्यांना कोलन इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी, 29 एप्रिल 2020 रोजी, या महान कलाकाराने अखेरचा श्वास घेतला.
जेव्हा इरफान खानयांचे २९ एप्रिल २०२० ला निधन झाले आणि जेव्हा त्यांची निधनाची बातमी गावात पोहोचली, तेव्हा सगळ्यांचं जग उद्ध्वस्त झालं. त्यांचा कुटुंबातील सदस्य, त्यांचा हिरो आता त्यांच्यात नव्हता.
इरफानचा कायम जिवंत वारसा;

गावकऱ्यांना हे दु:ख पचवणं कठीण होतं, पण त्यांनी ठरवलं की इरफानच्या स्मृतीला त्यांना कायम जपायचं आहे.
म्हणूनच त्यांनी गावाचं नाव बदलून ‘हीरो ची वाडी’ ठेवलं, ज्याचा अर्थ हा ‘Neighbourhood of a Hero’ असा आहे. हे नाव इरफान खानला आदरांजली देण्यासाठी ठेवण्यात आलं, ज्याने गावकऱ्यांचं जीवन सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले. इरफान खान आता आपल्यात नाही, पण त्यांचा वारसा हीरो ची वाडी या नावात आणि गावकऱ्यांच्या मनात कायम जिवंत राहील. गावकऱ्यांसाठी तो फक्त अभिनेता नव्हता, तर त्यांचा भाऊ, मित्र आणि आधारस्तंभ होता. या गावाने आपल्या हिरोला खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली आहे, आणि त्याची ही कहाणी पिढ्यानपिढ्या सांगितली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी; जुई काळे











































