पुरंदर, २९ ऑक्टोबर २०२०: सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींना सामोरे जावं लागणार्या छेडछाडीवर आळा घालण्यासाठी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे महाराष्ट्रातील पहिले लिंगभाव प्रशिक्षण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सासवड येथील बस स्थानकात पार पडले. या प्रशिक्षणात सासवड एसटी आगारामध्ये कार्यरत असलेले २०८ वाहक, चालक व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
ग्रामीण भागात महिलांसोबत काम करणाऱ्या महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ म्हणजेच मासूम कडून घेतलेल्या या प्रशिक्षणाचा समारोप सोहळा आज दि. २९ रोजी सासवड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात पुरंदर तालुक्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत तसेच मासूमचे संस्थापक डॉ. रमेश अवस्थी, डॉ. मनीषा गुप्ते उपस्थित होते. महाराष्ट्रातील या मुद्द्यावरच्या प्रशिक्षण मालिकेची सुरुवात पुरंदर तालुक्यात झाली असून, यापुढं पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पोलीस विभागासाठीदेखील हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे अशी माहिती मासुमच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी कौतुक केले. इतर विभागांमध्ये देखील प्रशिक्षणाचे आयोजन करणार असल्याचे त्या म्हणाल्या. या विषयावरती संवेदनशीलता वाढवण्यासाठी आपल्याला यापुढे आणखी कोणते प्रशिक्षण वर्ग घेता येईल हे पाहिले पाहिजे. यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. अजून ग्रामीण भागांमध्ये मुलीची छेड झाली तर त्याच्यावरती मोकळेपणाने बोलण्याचे वातावरण नसते व पहिला दोष मुलीलाच दिला जातो. या किरकोळ गोष्टींमुळे मुलींच्या प्रगतीवर कीळ बसते. असे सरनोबत यावेळी म्हणाल्या.
२६ वर्षांपासून वाहक म्हणून कार्यरत असलेले कैलास जगताप यावेळी म्हणाले की, महिलांसोबत होणार्या छेडछाडीच्या बर्याच प्रसंगांना आम्हाला सामोरं जावं लागतं. आम्ही पण या प्रसंगांना विरोध करतो. पण या प्रशिक्षणामुळे मुलीवर त्याचे काय परिणाम होतात याची जाणीव आम्हाला या प्रशिक्षणामधून झाली.
या एकदिवसीय प्रशिक्षणात सामाजिक लिंग, स्त्री पुरुष समानता, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी असणारे कायदे, घरात आणि घराबाहेर महिला आणि मुलींना सुरक्षित वाटावे म्हणून करता येण्यासारख्या उपाय योजना, भारताचा नागरिक म्हणून आणि एमएसआरटीसीचे कर्मचारी म्हणून महिला सुरक्षिततेप्रती असणारी सर्वांची जाबाबदारी अशा सर्व विषयांवर चर्चा झाली. नामांकित व्यक्तींनी ह्या विषयावर प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण पार पडले असल्याने खबरदारी म्हणून सर्व साधन व्यक्तींची भाषणे आधीच व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून ठेवण्यात आली होती. प्रशिक्षणार्थींना ती मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली. याचबरोबर छोट्या गटचर्चा, शैक्षणिक व्हीडीओ आणि गाणी यांचा वापर प्रशिक्षणात करण्यात आला. महिला आणि मुलींना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वाटावे म्हणून व्यतिगत आणि संस्थात्मक पातळीवर काय करता येईल याचे संकल्पही सर्व प्रशिक्षणार्थींनी घेतले. ह्या प्रशिक्षणामुळे ह्या प्रश्नाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोण त्यांना मिळाला अशी भावनाही प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली. मासूम आणि एमएसआरटीसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा परिणाम महिला आणि मुलींच्या सार्वजनिक सुरक्षिततेत वाढ होण्यास नक्की होईल अशी आशा आगर व्यवस्थापक मनीषा इनामके यांनी व्यक्त केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे