महाराष्ट्रातील किल्ले… इतिहासाची साक्ष

” महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी वेढलेला आहे. त्यातच या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये विविध किल्ले सौंदर्याने नटलेले आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गडकिल्ले जिंकून त्याची देखभालही त्याच ताकदीने केली. ते किल्ले आजही इतिहासाची साक्ष देतात. परंतु सध्याच्या स्थिती पाहता या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे.”


किल्ल्यांची होत असलेली पडझड, त्याची दुरवस्था यामुळे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या गडकिल्ल्यांची देखभाल दुरुस्ती होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेच परंतु शासनाने यासाठी विशेष निधी उपलब्ध करुन त्या गडकिल्ल्यांवरची कामे तातडीने मार्गी लावली पाहिजे. तरच किल्ल्यांचे संवर्धन होण्यास मदत होईल. याच गडकिल्ल्यांचा “न्युज अनकट” च्या टीमने घेतलेला आढावा…


किल्ले सिंहगड:

पुणे शहरापासून साधारणतः २५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव “कोंडाणा” असे होते. त्या काळात शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एकाच लढाईत जिंकला. या लढाईतच तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले होते.”गड आला पण, सिंह गेला” हे वाक्य महाराजांनी याच गडावर उच्चारले होते.
सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भलेशवराच्या रांगेवर हा किल्ला वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून जवळपास ४४०० फूट उंचावर आहे. पूर्वी हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. त्यावेळी दादोजी कोंडदेवांना आदिलशहाने सुभेदार म्हणून नमले होते. इ.स.१६४७ मध्ये त्यांनी याच गडावर आपले लष्करी केंद्र बनवले होते. परंतु १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाला परत दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना परत देण्यात आले, त्याच्यामध्ये कोंढण्याचाही समावेश होता.
पुणे सारख्या शहराजवळ हा किल्ला असल्याने येथे येणारा पर्यटक जास्त आहे. तसेच महाराष्टातून पर्यटक याठिकाणी येतात. सिंहगडाच्या पायथ्याशी खडकवासला धरण असल्यामुळे याठिकाणाला विशेष महत्व आहे.

– प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा