नागपूर, २० जानेवारी २०२४ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यातील पहिला पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला १९ जानेवारीपासून सुरुवात झाली. या निमित्ताने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर भवनाचे तसेच स्वर्गीय डॉ. कमलाकर तोतडे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. हे सभागृह रामटेकच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरेल, असा विश्वास यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
रामटेकचा इतिहास लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. रामटेक ही प्रभूश्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे तसेच कालिदासांचा सहवास या परिसराला लाभला आहे. भविष्यात हा इतिहास नवीन पिढीपर्यंत आधुनिक माध्यमातून पोहोचेल, असा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. रामटेकच्या गडासाठी रोप-वे मंजूर झाला असून लवकरच त्याचे भूमिपूजन होणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
या महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटनानंतर पद्मश्री हेमा मालिनी यांनी रामायण नृत्य नाटिका सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. १९ ते २३ जानेवारी दरम्यान होणारा हा महोत्सव दोन भागात आयोजीत करण्यात आला आहे. सकाळ आणि सायंकाळी चालणाऱ्या या महोत्सवात गीत, संगीत, नाट्यकलेची रसिकांना मेजवानी मिळत असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकारही सहभागी झाले आहेत. नेहरू मैदानात होत असलेले या कार्यक्रमाच्या मेजवानीचा आस्वाद मोफत घेण्याकरीता प्रोजेक्टर लावण्यात आले आहेत. शनिवार, २० जानेवारीला पद्मश्री सुरेश वाडेकर यांचे गीतगायन होणार असून, रविवार, २१ जानेवारीला विख्यात गायक हंसराज रघुवंशी यांचा भक्तिगीत कार्यक्रम होणार आहे. तर सोमवार, २२ जानेवारीला रामटेकवरील सिंधुरागिरी महानाट्य आणि मंगळवार, २३ जानेवारीला प्रख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांची स्वरसंध्या हा कार्यक्रम होणार आहे.
सकाळच्या सत्रात कवी कालिदासांवर प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे महाखिचडी तयार करणार आहेत. याशिवाय लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा, फोटोग्राफी, पेंटिंग स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, एरोमॉडेलिंग शो, फूड फेस्टिव्हल आदींचे आयोजन करण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – नीता सोनवणे