रत्नागिरीत ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सव

रत्नागिरी १२ जानेवारी २०२४ : ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ११ ते १५ फेब्रुवारी महासंस्कृती महोत्सव होणार आहे. यामधून महाराष्ट्राची संस्कृती, लोकपरंपरा, स्थानिक सण, उत्सव यांचे दर्शन घडविणारे कार्यक्रम होणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आज दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार सर्वसाधारण हनुमंत म्हेत्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त महा संस्कृती महोत्सव आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय काढले आहेत. त्यानुसार आपल्याही जिल्ह्यात ११ ते १५ फेब्रुवारी या तारखा गृहीत धरुन नियोजन करावे. यासाठी प्रमोद महाजन क्रीडा संकुल हे ठिकाण निश्चित करा. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करावे. दशावतार, जाखडी, नमन यासारख्या लोककलांना यामध्ये वेळ द्यावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांचे सचित्र दालन, पर्यटन विषयक दालनाचे नियोजन करावे. बचतगटांच्या विक्री स्टॉलचे नियोजन करावे. या महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनामध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे.

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी नियोजनाबाबत सादरीकरण केले. ते म्हणाले, निश्चितपणे जिल्ह्याला साजेसा आणि स्थानिक कलाप्रकारांना तसेच स्थानिकांना प्राधान्य देऊन दिमाखदार महोत्सव करु. त्याबाबत नियोजन सुरु आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा