पुणे– पिंपरी, १८ फेब्रुवारी २०२३ :पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध महादेव मंदिरांत “हर हर महादेव” च्या जयघोषात महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली. महाशिवरात्रीनिमित्त महापूजा, अभिषेक, भजन, कीर्तन, महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरांना फुलांची सजावट करण्यासह रोषणाई केली आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. काही मंदिरांत चार-पाच दिवसांपासूनच काही मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे; तसेच शिवलीला कथा पठण सुरू झाले आहे.
- महादेव मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मध्यरात्रीपासून सुरू झालेले धार्मिक विधी, पहाटेपासून दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग, मंदिरात अंखड सुरू असलेल्या ‘ओम नम: शिवाय’ या नामस्मरणामुळे भारावलेल्या वातावरणात पुण्यात महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली.
महाशिवरात्रीनिमित्त ओंकारश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, कोथरूडमधील मृत्युंजयेश्वर मंदिरासह मध्यवर्ती पुण्यातील उपनगरांतील शिवमंदिरांत विद्युत रोषणाई आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने सजलेली ही मंदिरे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. दिवसभर महारुद्र अभिषेक, होमहवन, महाप्रसाद, कीर्तन, व्याख्यान असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
दरम्यान, शहरात प्राचीन शिवालयांसह विविध मंदिरे आहेत. यामध्ये चिंचवडगावातील धनेश्वर मंदिर, पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर यासह रावेत गावठाण, आकुर्डी, निगडी-प्राधिकरण, चिखलीगाव, म्हेत्रे वस्ती, देहूतील सिद्धेश्वर मंदिर, मोशीतील गायकवाड वस्ती, देहू-आळंदी रोड, भोसरी गावातील लांडगे आळी, निगडी, दापोडी, पिंपरी, काळेवाडी, तळवडे; तसेच कासारवाडीतील शंकरवाडी आदी मंदिरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कानावर पडत असलेल्या भक्तिगीतांमुळे परिसरातील वातावरणही प्रसन्न होते. मंदिर परिसरात हार-फुलांची दुकानेही मोठ्या प्रमाणात सजली आहेत. यासह मिठाई व खेळणींचीही दुकाने थाटली आहेत. दरम्यान, देहूरोडजवळील घोरावडेश्वर डोंगरावरील प्राचीन मंदिरातही विविध कार्यक्रम होणार आहेत. येथे देहूरोड परिसरासह पिंपरी-चिंचवड व तळेगाव, वडगाव, लोणावळा आदी ठिकाणचे भाविक दर्शनासाठी येत असतात. पोलिस बंदोबस्तासह पार्किंग व दर्शनबारीची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील, प्रज्ञा फाटक