महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींची संभाजी भिडे यांच्या विरोधात पुण्यात तक्रार, भिडेंच्या अडचणी वाढणार?

पुणे, १० ऑगस्ट २०२३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभरात वातावरण चांगलेच पेटले आहे. राज्यात ठिकठिकाणी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.अमरावतीसह अनेक जिल्यात संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता संभाजी भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुण्यात संभाजी भिंडे यांच्या विरोधात तक्रार दिलीय. यामुळे भिडे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी पुणे शहरातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आपल्या वकीलासोबत दाखल झाले. त्यांनी संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तक्रार दाखल केली. संभाजी भिंडे यांचा बोलविता धनी आरएसएस आणि नागपूर असल्याचा आरोप तुषार गांधी यांनी यावेळी केला. त्यांच्यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक आणि सभागृहाच्या बाहेर वेगळे बोलतात, असे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी तुषार गांधी म्हणाले, संभाजी भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही तक्रारीत केली आहे. संभाजी भिंडे यांनी आमच्या कुटुंबातील महिलांचा अपमान केला आहे. महात्मा गांधी आणि यांच्या आई आणि वडिलांवर त्यांनी टीका केली आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संभाजी भिडेवर कारवाई होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तुषार गांधी, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, मेधा पुरव सामंत, अन्वर राजन, संकेत मुनोत, युवराज शहा यांनी संभाजी भिडे आणि कार्यक्रम आयोजन करणाऱ्या आयोजकांवर तक्रार दाखल केली आहे. कलम ४९९ अब्रू नुकसान करणे, अपमान करणे, स्त्रीत्वाचा अपमान करणे, कलम १५३ (अ) समाजामध्ये शत्रुत्व पसरवणे, कलम ५०५ गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा करणे, हे गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केली असल्याचे तुषार गांधी यांचे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी चौकशी करून आम्ही गुन्हा नोंद करू, असे सांगितल्याचेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा