नगर: विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर शिक्षकांचे वेतन ठरविणारे परिपत्रक मागील भाजप सरकारने काढले होते. या परिपत्रकाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांनी अभ्यासगटाचा मुद्दा उपस्थित केल्यावर शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभ्यासगट रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजप सरकारच्या काळात विविध विषयांच्या तब्बल ३३ समित्यांची घोषणा करण्यात आली होती. त्यात अधिकाऱ्यांचे गट तयार करण्यात आले. यात शिक्षकांना वेतन अनुदान देण्याऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान देण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती. या संदर्भात समितीने अभ्यास करून शिक्षकांना थेट वेतन अनुदान देण्याऐवजी विद्यार्थी संख्येनुसार संस्थासंचालकांना अनुदान देण्याबाबत सूचना केली. यामुळे शिक्षकांच्या वेतनावर टाच येणार होती. शिवाय ज्या वर्गात विद्यार्थी कमी, त्या शिक्षकाचे वेतनदेखील कमी होणार होते; तसेच ती रक्कम संस्थेकडे वर्ग होणार असल्याने त्याच रकमेतून शाळा चालवावी लागली असती.