मुंबई, दि.१३ जून २०२० : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त झाल्या आहे. या रिक्त जागेवरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीत नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस नेत्यांनी १२ जागा आणि महामंडळाच्या नेमणुकीसाठी नवी मागणी केली असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे.
गुरुवारी (दि.११) रोजी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे पालक मंत्री असलम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेते उपस्थित होते.
या बैठकीमध्ये येणाऱ्या काळात विधान परिषदेच्या जागा आणि महामंडळावर नेमणुकीबद्दल समसमान वाटप व्हावे, अशी चर्चा करण्यात आली असून याआधीही आमदारांच्या संख्येवरून मंत्रिपदाचे वाटप झाले होते. परंतु इतर बाबीत सर्व वाटप हे समसमान होईल, असं महाविकास आघाडीत ठरलं होतं. एवढंच नाहीतर विधान परिषदेच्या जागा ही तिन्ही पक्षांनी समान वाटून घ्याव्यात, असा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता.
परंतु, विधान परिषदेत जागा वाटप करत असताना शिवसेनेला ५ जागा, राष्ट्रवादी ४ तर काँग्रेसला ४ जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावामुळे काँग्रेसच्या गटात नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी विधान परिषदेच्या जागा वाटपात समसमान व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. याबद्दल लवकरच काँग्रेस नेते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून त्यावर तोडगा काढणार असल्याची माहिती समोर येत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: