मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकवण्यात अजित पवार हेच महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तविल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी हा खुलासा केला आहे. या लेखात राऊत यांनी म्हटले आहे की, ८० तासांचे सरकार ज्यांनी आणले व पडले त्यांना असे वाटते की, हे सरकार ८० दिवसही टिकणार नाही. भाजपच्या सर्व आशा आजही अजित पवारांवरच टिकून आहेत. मात्र, संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अजित पवारांच्या भूमिकेविषयी मी शरद पवार यांना विचारले.
तेव्हा ‘अजित पवारांची चिंता करू नका. हे सरकार पाच वर्षे तेच टिकवतील. निश्चिंत राहा’, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केल्याचे राऊत यांनी सांगितले.
तसेच शरद पवार निश्चिंत आहेत तोपर्यंत सरकार स्थिर आहे. महाराष्ट्र निश्चिंत आहे. नागपूर अधिवेशानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
भाजप आणि शिवसेनेत २५-३० वर्षे नव्हता. त्यापेक्षा उत्तम संवाद सरकारमधील तीन पक्षांमध्ये दिसत आहे. आघाडी सरकार चालवणे ही एक कला आहे व असे सरकार चालवणाऱ्या प्रमुख नेत्यांकडे मनाची दिलदारी असावी लागते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे ही दिलदारी मला पहिल्या दिवसापासून दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारचा उद्यापासून खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. आजपासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. ठाकरे सरकारचे हे पहिले अधिवेशन केवळ सातच दिवसांचे असणार आहे. शेतकरी कर्जमाफी, स्थगित केलेले प्रकल्प, खातेपाटप यांसारख्या मुदद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.