किचकट प्रक्रिया इतिहासजमा घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज!

घर किंवा मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यावर वीजबिलावरील नाव बदलण्याची किचकट आणि महिनाभर चालणारी प्रक्रिया आता इतिहासजमा झाली आहे! महावितरण (MSEDCL) ने ग्राहकांना मोठा दिलासा देत, नाव बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि स्वयंचलित केली आहे. या क्रांतिकारक बदलामुळे, जे काम पूर्ण होण्यासाठी पूर्वी ३० दिवस लागायचे, ते आता अवघ्या ३ ते ७ दिवसांत पूर्ण होणार आहे.

कशासाठी होतो हा बदल?

घर खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा कायदेशीर हस्तांतरणामुळे मालमत्तेच्या मालकीत बदल झाल्यावर, वीजबिल हा मालकीचा महत्त्वाचा पुरावा ठरतो. त्यामुळे त्यावर नवीन मालकाचे नाव असणे बंधनकारक असते.

असा करा सोपा ऑनलाइन अर्ज

ग्राहकांना नाव बदलण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा ‘महावितरण मोबाइल ॲप’ वर ‘न्यू कनेक्शन / चेंज ऑफ नेम’ या पर्यायाखाली अर्ज करता येईल. अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत आणि प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरायचे आहे.

स्वयंचलित मंजुरीमुळे वेळेची बचत

महावितरणने अर्जदाराच्या सोयीसाठी स्वयंचलित मंजुरीची नवी प्रणाली सुरू केली आहे. कागदपत्रे आणि शुल्काची प्रक्रिया पूर्ण होताच, ही प्रणाली अर्ज मंजूर करते. यामुळे ग्राहकांना आता कार्यालयात वारंवार चौकशीसाठी फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही.

प्रत्येक टप्प्याची माहिती SMS द्वारे

प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी, अर्ज दाखल केल्यापासून ते मंजूर होईपर्यंत प्रत्येक टप्प्याची माहिती अर्जदारास त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे पाठवली जाते.

महावितरणच्या या ग्राहक-केंद्रित निर्णयामुळे ग्राहकांचा वेळ, श्रम आणि पैसा यांची मोठी बचत होणार असून, शासकीय प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान झाल्याचे सिद्ध झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे