शिवाजी पार्कवर ‘महायुती’ चा दिपोत्सव, CM शिंदे, फडणवीस, राज एकाच मंचावर, चर्चांना उधाण

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२२ : राज्यात दिवाळी सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. काल दिवाळीचा पहिला दिवस होता. अनेकांच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि नवी स्वप्न घेऊन येणारा हा सण महाराष्ट्रातही तितक्याच जल्लोषात साजरा होतो. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. मनसेच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क परिसर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमाच्या माध्यमातून लख्ख दिव्यांनी उजळून टाकला जातो. यंदाही मनसेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मनसेच्या या दीपोत्सव कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र दिसले आहेत.

दरवर्षी मनसेच्या वतीने दिवाळी निमित्त दादर शिवाजी पार्क परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा या कार्यक्रमाचा शुभारंभ २१ ऑक्टोबरला पार पडला असून या कार्यक्रमास राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या कार्यक्रमाबाबत राज ठाकरे यांची स्वाक्षरी असलेले पत्र शिवाजी पार्क, दादर परिसरात मनसेच्या वतीने वाटण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात दादरकर आणि मुंबईकरांना पत्र लिहिलं होतं. कोरोनाच्या संकटामुळं दिवाळी साजरी करता आली नव्हती. मात्र यावेळी दिवाळीचा उत्साह आणि आनंद दिसतोय. त्यामुळं दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले आहे, हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. अनेक लोक भेटतात आपल्याला विनंती करतात. आपण त्यांच्या समस्या सोडवू शकतो. आपण शेतकऱ्यांनाही आधार द्यायला हवा. आमचे सरकार बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जेवढे काही देता येईल, आपण तेवढे देऊ. सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी हे सरकार प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा