नवी दिल्ली, २१जुलै २०२३ : मणिपूर येथील हिंसा आणि दोन महिलांची नग्नधिंड निघाल्याच्या प्रकारावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात. मणिपूरचा विषय गंभीर आहे. त्यावर यूरोपीयन पार्लमेंटमध्ये चर्चा होते.परंतु मणिपूरच्या विषयावर आपल्या संसदेत चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे, असे सांगतानाच तुम्ही देशात समान नागरी कायदा आणत आहात ना? त्याआधी मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करा, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
मागील ७० दिवस होत आले तरीही मणिपूर शांत करता येत नाही. तुम्ही इथे बसून जगाचे प्रश्न सोडवत आहात. आधी मणिपूर शांत करा. मणिपूर हा देशाचा भाग आहे. मणिपूरमधील जनता देशाचे नागरीक आहेत. मणिपूरमधील दोन महिलांना रस्त्यावर आणून नग्न करून मारले जाते. ही देशातील १४० कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणता ना? मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मणिपूरची हिंसा रोखता आली नाही. त्यामागचे कारण काय असावे असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर, पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमागे स्वार्थ असतो. कोणत्याही स्वार्थाशिवाय ते काही करत नाही. त्यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ ठरवेल. ८० दिवसानंतर पंतप्रधानांनी संसदेबाहेर प्रतिक्रिया दिली. त्याला काय अर्थ आहे? तुम्ही आधी मणिपूरवर बोला. निर्भयाकांड झाले, तेव्हा संपूर्ण सरकार हलले होते. परंतु मणिपूरच्या घटनेवर सरकार काहीच बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली.
मुंबईतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केले. या मुंबईत सर्वच कोव्हिड सेंटरने उत्तम काम केले आहे. डॉक्टर आणि नर्ससह कोव्हिड सेंटर चालवणारे लोक यांनी चांगले काम केले आहे. पेंडामिक अॅक्टनुसार काम केले आहे. पण काही लोकांच्या पोटात गोळा उठला आहे. चांगले काम केल्याचे त्यांना पाहवत नाही. लोकांचे जीव वाचवले. चांगले काम केले. त्याचा फायदा महापालिकेत आम्हाला होईल. त्यामुळे टार्गेटेड लोकांना पकडले जात आहे. हा यांच्या जवळचा तो त्यांच्या जवळचा आमचा काय संबंध? असा सवाल त्यांनी केला.पाटकर यांच्या मुद्द्यावरून परवा अश्लील क्लिप आली. ती व्यक्ती फडणवीस यांच्या जवळची आहे. निकटवर्तीय. पंतप्रधानांच्या जवळचा आहे. मग त्यात त्यांचा सहभाग आहे का? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परीस्थीतीवर यावेळी त्यांनी भाष्य केले. अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तुम्हाला खात्रीने सांगतो. ते भावी मुख्यमंत्री आहेत. भावी म्हणजे फार भावी नाहीत. काय घटना घडतात ते मला माहीत आहेत. मलाही राजकारण कळते. शिंदे गटाने आता सत्य स्वीकारले पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर