नाशिक, १३ ऑक्टोबर २०२२: नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष व भाजीपाला ही पिके घेतली जातात. खरीप हंगामच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात किटकनाशकाचा वापर केला जातो. त्यामुळे आज कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून दिंडोरी तालूक्यातील तळेगाव दिंडोरी येथील नंदिनी किचन अॅल्पिकेशन प्रा. लि. यांच्या आवारात बनावट किटकनाशकाचा साठा असल्याचा.
संशय कृषी विभागाला आल्यामुळे ताबडतोप कारवाई करण्यात आली आहे. अधिकृत किटकनाशके विक्रेत्यांव्यतिरिक्त शेतकऱ्यांना अनाधिकृत व्यक्तिकडून कमी दरात बनावट किटकनाशके उपलब्ध करुन दिले जात असल्याचा संशय कृषी विभागास होता. कृषी विभागाने सापळा रचून विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानूसार ही कारवाई करण्यात आली आहे.
भरारी पथकाने बनावट किटकनाशकाचा सुमारे २९५ किलो/लिटरचा साठा जप्त केला असून, त्यांची आजची किंमत ६.१६ लाख रुपये एवढी आहे. कारवाई वेळी कृषी अधिकारी म्हणून दिपक साबळे हे उपस्थित होते. संशयित आरोपी दिपक मोहन अग्रवाल यांच्या विरोधात किटकनाशक कायदा १९६८, किटकनाशक नियम १९७१,
पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत अभिजीत घुमरे जिल्हा गुणवत्ता नियंत्रन निरीक्षक यांनी पोलिस ठाणे दिंडोरी येथे फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर