नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०२२ ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) संघटना पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) निशाण्यावर आहे. एनआयएकडून आज (गुरुवार) पहाटेच केरळमधील पीएफआयशी संबधित असणाऱ्या तब्बल ५६ ठिकाणांवर छापेमारी करण्यात येत आहे.
दरम्यान, आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. ही कारवाई सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घातल्यानंतर या संघटनेतील दुसऱ्या फळीतील नेते वेगळ्या नावाने पीएफआयचे काम करत असल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास ही छापेमारी सुरू झाली. केरळच्या एर्नाकुलममध्ये पीएफआयच्या नेत्यांशी संबंधित आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत, तर तिरुअनंतपुरममधील सहा ठिकाणं एनआयएच्या रडारवर आहेत.
स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या बंदी घातलेल्या संघटनांचे सदस्य ‘पीएफआय’चे संस्थापक आहेत. ‘पीएफआय’ची स्थापना २००६ मध्ये केरळमध्ये झाली असून, त्याचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.