मध्यरात्री दरी पुलावर ट्रकचा मोठा अपघात; दोन जखमींची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

पुणे, ६ डिसेंबर २०२२ : जांभूळवाडी दरी पूल येथे साताऱ्यावरून पुण्याच्या दिशेने निघालेला एक ट्रक आज पहाटे तीनच्या सुमारास पलटी होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चालक जखमी अवस्थेत अडकला असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन रवाना करण्यात आले.

सिंहगड अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता केबिनमधे जखमी अवस्थेत अडकलेल्या चालकाशी संवाद साधून धीर देत जवानांनी क्रेनच्या साहाय्याने चालकाला पंधरा मिनिटांत बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु रस्त्यावर पलटी झालेला ट्रक पाहून एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना मदतीकरिता पुढे आला. मात्र, त्या ट्रकने काही प्रमाणात पेट घेतल्याने सदर दुचाकीस्वाराने घाबरून स्वतःचा बचाव करण्यासाठी दरी पुलावरून खाली उडी मारली. काही वेळाने त्याच्या ओरडण्याचा आवाज तेथील स्थानिक नागरिकांना आला. अग्निशमन दलाचे जवान आणि उपस्थित नागरिक यांच्या मदतीने त्या दुचाकीस्वारास जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.

या अपघाताचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनातील तेल पडल्याने इतर वाहने घसरून पडण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून धोका दूर केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा