नवी दिल्ली, २८ जानेवारी २०२१: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी च्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी निदर्शने, दिल्ली हिंसाचार, राज्य विरुद्ध केंद्र लढा आणि आगामी बंगाल निवडणुका यासह अनेक मोठ्या मुद्द्यांवर खुलेआम भाष्य केले. या दरम्यान सीएम ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कठोर हल्ला केला.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ममता बॅनर्जी यांना मुलाखतीच्या वेळी विचारले की, सरकार असे म्हणत आहे की, त्यांचे बहुमत आहे आणि कृषी बिले संसदेमधून मंजूर झाली आहेत. मग विरोधक का अडथळा आणत आहे? यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘बहुमत तुम्हाला (भाजपा) लोकांना मारण्याची परवानगी देत नाही’. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. शेतकरी विधेयक घाईघाईने आणले गेले आणि कोरोना दरम्यान व्हॉइस मताने ते मंजूर झाले. मुलाखती दरम्यान सीएम ममता म्हणाल्या की, कृषी कायद्याबाबत राज्य सरकारांकडून कोणतेही मत घेतले गेले नाही. अखेर, भारत एक देश, एक पक्ष असा असू शकत नाही. पंतप्रधान मोदी वन मॅन शो प्रमाणे भारत चालवू शकत नाहीत.
टीएमसी प्रमुख म्हणाल्या की माझे पंजाबी बंधू भगिनी यांच्यात एकी आहे. बंगाल बरोबरच देशातील इतर भागात देखील त्यांच्यात एकी आहे. उद्धव ठाकरे, एमके स्टालिन आणि अरविंद केजरीवाल काय बोलत आहेत ते पहा. आम्ही सर्व एकत्र आहोत.
त्यांनी सांगितले की शेतकरी आंदोलनात कोणत्याही नेत्याचा हात नाही. ते त्यांच्या स्वबळावर हे आंदोलन करत आहेत. त्या म्हणाल्या की अमित शाह स्वतः म्हणाले होते की त्यांच्याकडे ५१ लाख व्हाट्सएप ग्रुप आहेत. ज्याचा वापर ते शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी करू शकतात.
ममतांनी राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील वादावरून असे सांगितले की, केंद्र सरकारने राज्यांच्या सर्व अधिकारांवर आणि शक्तीवर नियंत्रण मिळवले आहे. संघीय रचनेला ते मोडत आहेत. रोज ते असे सांगत आहेत की एक देश एक पक्ष. जे देशासाठी घातक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे