Makarand Anaspure comments on Ajit PawarT : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय टोला लगावला. “अजितदादांना सांगा की लाडक्या बहिणींनाच नाट्यगृह हवं आहे, म्हणजे निधी लवकर मिळेल,” असे मिश्किल उद्गार त्यांनी काढले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.
या सोहळ्याला आमदार सुनील शेळके, प्रगतिशील शेतकरी सुनील जाधव, नंदकुमार वाळंज, नाट्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, विश्वास देशपांडे, विलास काळोखे, संजय वाडेकर, सुरेश दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना अनासपुरे यांनी जागतिक दहशतवादाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “जगभरातील दहशतवाद्यांच्या डोक्यातून त्यांच्या धर्माविषयीची चुकीची कल्पना काढून टाकून त्यांचे ब्रेनवॉश करण्याची शक्ती ईश्वराला मिळो,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे शहरात नाट्यगृह उभारणीसाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. “येत्या जून-जुलैमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे आणि हे काम लवकरच मार्गी लागेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वर्धापनदिनानिमित्त कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा ‘कलागौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हास्यजत्रा फेम लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेते प्रसाद खांडेकर यांना कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, सतार वादक विदुर महाजन यांना जीवन गौरव पुरस्कार आणि प्रा. नितीन फाकटकर यांना विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.मकरंद अनासपुरे आणि आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. या पुरस्कारामुळे कलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला आणि नाट्य परिषदेच्या वर्धापनदिनाला एक विशेष रंगत चढली.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे