मुंबई, १४ जुलै २०२० : कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांकडून प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने त्याचा परिणाम उपचारावर होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना प्लाझ्मा दान करणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रकडून (आयएमए) करण्यात आली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि अँटीव्हायरल औषधांचा तुटवडा यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी जीवनरक्षक उपाय म्हणून प्रभावी ठरत आहे. परंतु रुग्णांकडून प्लाझ्मादान करण्याचे प्रमाण अल्प असल्याने त्याचा परिणाम उपचारावर होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रकडून (आयएमए) करण्यात आली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्राणवायूची कमतरता भासल्यास त्यांना ऑक्सिजन किंवा आयसीयूत दाखल करावे लागते. या रुग्णांवर प्लाझ्मा थेेरेपी केल्यास त्यांना लवकर बरे करणे सहज शक्य होईल, परंतु महाराष्ट्रातील विविध हॉस्पिटलमध्ये याचा पुरेसा वापर केला जात नाही. प्लाझ्मा दाते पुरेशा संख्येने उपलब्ध नसल्याने प्लाझ्मा थेरपीचा अवलंब करता येत नाही. प्लाझ्मा थेरेपीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी व प्लाझ्मा उपलब्ध होण्यासाठी कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करणे बंधनकारक करावे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व रुग्णांकडून आजारातून बरे झाल्यावर १५ व्या दिवशी पुनर्तपासणीसाठी बोलवण्यात यावे. त्यावेळी त्यांची सर्वसाधारण तपासणी करून ते तंदुरुस्त असल्यास त्यांना प्लाझ्मासाठी रक्तदान करण्यास उद्युक्त करावे, अशी सूचना आयएमएकडून महाराष्ट्र सरकारला करण्यात आली आहे.
प्लाझ्माची उपलब्धता आणि रुग्णांसाठी त्याचा वापर वाढवल्यास कोरोनातून मुक्त होण्याचा दर वाढेलच पण राज्यातील मृत्यूदरही आटोक्यात आणता येईल, असा विश्वास आयएमएने व्यक्त केला आहे. यासाठी प्लाझ्मासाठी रुग्णांनी रक्तदान करावे यासाठी महामारी कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार किंवा नवीन अध्यादेश काढून सरकारने प्लाझ्मा संकलनासाठी रक्तदानाची प्रक्रिया अनिवार्य करावी, अशी मागणी आयएमएकडून करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी