मला रोग नाही मी बाहेर पडणारच…

पुणे, दि. २६ एप्रिल २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लॉक डाउनचे पालन सर्वत्र केले जात आहे. मात्र तरीही काही नागरिक कसलीही तमा न बाळगता घरा बाहेर पडत आहेत. पोलीस असो किंवा इतर नागरिक, कोणालाच न जुमानता त्यांच्या सांगण्याकडे सर्रास दुर्लक्ष करून ही मंडळी बिनदिक्कतपणे रस्त्यावर फिरत आहेत. असाच एक प्रकार पुण्याच्या एक सोसायटीमध्ये नुकताच घडला.

आपल्या मुलाला घेऊन एक गृहस्थ सोसायटीच्या आवारामध्ये खेळण्यासाठी घेऊन आले. तिथे राहत असलेल्या इतर नागरिकांनी त्यांना घरात जाण्यास सांगितले असता त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर आपण कसे चुकत नाही आहोत असा वादही ते घालू लागले.

त्यांचे म्हणणे होते की, लॉक डाउन मुळे बाहेर पडता येत नाही त्यामुळे माणसेच काय तर लहान मुले देखील घरात बसून कंटाळली आहेत. मला रोग नाही त्यामुळं माझ्यापासून कोणाला धोका नाही असेही ते सांगत होते. ते असेही म्हणत होते की तुम्हाला रोग असेल तर तुम्हीच घरात बसा.
या गृहस्थांच्या वर्तनाची सर्वत्र हेटाळणी होत आहे. फोटोमधे त्यांच्या सोबत त्याचा लहान मुलगा फूट बॉल खेळताना दिसत आहे.

लॉक डाउन मुळे सर्वच जण कंटाळले आहेत परंतु याला सध्या तरी काहीच पर्याय नाही. कोरोना आपल्या घरात येऊ नये असे वाटत असले तर सर्वांनी संयमाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तुम्हीही घरातच रहा आणि सुरक्षित रहा. यामुळेच आपला देशही सुरक्षित राहील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा