भिवंडी (ठाणे), दि. २२ जुलै २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत जातोय. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये जुलै महिन्यापासून नवे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी संसर्ग कमी करण्यासाठी मालेगाव पॅटर्न हाती घेतला आहे. यात त्यांनी कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत त्याच बरोबर रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण वाढविण्यात आले. शिक्षक, स्वयंसेवी संस्था, धर्मगुरूंच्या मदतीने शहरातील गल्लीबोळांत सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या महिन्याभरात येथील संक्रमित क्षेत्रांतील करोनाबाधितांचा आकडा काही प्रमाणात कमी होऊ लागला. त्यामुळे मालेगाव पॅटर्न सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने भिंवडीचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांची बदली करून त्यांच्या जागी मालेगावचा कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याचा अनुभव असलेल्या डॉ. पंकज आशिया यांची नियुक्त केली. डॉ. आशिया यांनी महापालिकेचा पदभार स्विकारताच दोन दिवस शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन मालेगावप्रमाणे भिवंडीतील कोरोना आटोक्यात आणण्याचे धोरण हाती घेतले. शहरातील प्रति दिवसाच्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण ७० ते ८० वरून ४०० पर्यंत वाढवण्यात आले. सुरुवातीला एका रुग्णाच्या संपर्कातील ७ ते ८ व्यक्तींच्या विलगीकरणाचे प्रमाण नव्या उपाययोजनेनुसार १६ वर नेण्यात आले आहे.
भिवंडीतील मालेगाव पॅटर्नमुळे रुग्णालयांमधील बेडच्या संख्येत कमालीची वाढ झाली. एवढेच नव्हेतर इंदिरा गांधी रुग्णालयातील आरोग्यव्यवस्थेवर विषेश लक्ष दिले जात आहे. केडीएमसीमध्ये मागील महिन्यापासून धारावी पॅटर्न राबवला जातोय त्यामुळे केडीएमसीमध्ये सध्या डोर टू डोर सर्व्हे केला जातोय आणि आता भिवंडीमध्ये मालेगाव पॅटर्न किती यशस्वी ठरतो हे पाहणे महत्वाच ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनीधी: राजश्री वाघमारे