बारामती: बारामती शहरात कोरोना संसर्गाची लागण झालेले सात रुग्ण आढळले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन पूर्ण खबरदारी घेत असताना बारामतीजवळ माळेगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बारामती शहराच्या जवळ आज दिनांक २४ एप्रिल २०२० रोजी माळेगाव येथील लकडेनगर येथे अजून एका रुग्णास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. तो रुग्ण माळेगाव बु. येथील लकडेनगरचा रहिवाशी आहे.
बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील हा पहिला रुग्ण आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच कोणीही विनाकारण बाहेर पडू नये अशी विनंती केली आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्ण कोणाच्या संपर्कात आला आहे त्याचाही शोध आता सुरू आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता लकडेनगर माळेगाव बु. हे केंद्र धरुन ३ किमी परिसरात कॅन्टोन्मेंट झोन म्हणून व तेच केंद्र धरुन ५ किमी परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळले आहे. हे आलेले संकट लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही बाहेर पडू नये. कॅन्टोन्मेंट झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून सर्व वाहनांची तपासणी करुन सोडण्यात येतील. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत पाहणी करण्यात येते आहे. अशी माहिती प्रांताधिकारी दादासो कांबळे यांनी दिली
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव