माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश

सोलापूर, दि. ८ मे २०२०: माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना तात्काळ होम क्वारंटाईन करण्याचे आदेश प्रांताधिकारी शमा पवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.

आमदार सातपुते माळशिरस तालुक्यामध्ये बीड, पुणे येथून आले होते. त्यानंतर त्यांनी माळशिरस पंचायत समितीमध्ये कोरोनाच्या संदर्भात सर्व काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती.

माळशिरस तालुक्यात इतर तालुका व जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून क्वारंटाईन करावे, असा प्रशासनाने आदेश दिलेला असताना सातपुते यांची तपासणी अथवा कॉरन्टाईन का केले नाही. त्यांना कॉरन्टाईन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी लेखी निवेदन देऊन केली होती.

आमदार राम सातपुते यांना एक न्याय व सर्वसामान्य माणसाला एक न्याय हे कशासाठी चालले आहे. असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे साठे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते.

आमदार राम सातपुते हे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र त्यांनी इतर जिल्ह्यातून प्रवास करुन येताच बैठक घेऊन अधिकारी यांच्याही अडचणीत भर टाकली. त्यांनी स्वतः क्वारंटाईन होणे गरजेचे होते, असे साठे यांनी निवेदनात म्हटले होते.

आमदार राम सातपुते यांनी प्रथम १४ दिवस होम क्वारंटाईन होऊन क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी मैदानात उतरावे, असे किरण साठे म्हणाले होते.

त्यानुसार प्रातांधिकारी यांनी आमदार सातपुते यांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश माळशिरस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा