मुंबई, ८ सप्टेंबर २०२३ : मुंबईत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरीची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीने पोलिस ठाण्यातील लॉकअप मध्ये पँटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, विक्रम अटवाल असे मृत आरोपीचे नाव आहे. त्याने लॉकअपमध्ये हाफ पँटच्या मदतीने गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास उजेडात आली. त्याच्यावर पवईत राहणाऱ्या रुपल आग्रे नामक एअर होस्टेसची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली होती. तेव्हापासून तो अंधेरी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये होता.
काय आहे प्रकरण?
मुंबईत रविवारी ४ सप्टेंबर २४ वर्षीय एअर होस्टेस रुपल ओग्रेची तिच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. गळा चिरुन तिची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी १२ तासाच्या आत त्याच इमारतीत काम करणारा सफाई कामगाराला अटक करुन या गुन्ह्याचा छडा लावला. आरोपीही पवईचा रहिवासी आहे. त्याची पत्नीही इमारतीतील कचरा उचलण्याचे काम करते. पवई पोलिसांनी या प्रकरणात विक्रम अटवाल याच्याविरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला. अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याची रवानगी अंधेरी पोलीस स्टेशनममध्ये करण्यात आली. इथे कोठडीत असताना त्याने पँटच्या सहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवलं.
अंधेरी पोलीस स्टेशनचं गेट बंद
दरम्यान, अंधेरी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आरोपीने आत्महत्या केल्यामुळे अंधेरी पोलीस स्टेशनचं गेट बंद करण्यात आलं आहे. अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त आयुक्त वेस्ट रीजन परमवीर सिंग दहिया आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ १० चे दत्ता नलावडे उपस्थित आहेत. आरोपीने आत्महत्या केल्यामुळे मुंबई पोलिसांच्या लॉकअपबाबतही सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांचा लॉकअपमध्ये आरोपींसाठी मोठा सिक्युरिटी लेयर असतो. तरीही आरोपींने आत्महत्या केल्यामुळे तसंच अंधेरी पोलिसांनी पोलीस स्टेशन गेट बंद केल्यामुळे तक्रारदारांचा मोठे हाल होत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे