मुंबई,५ जुलै २०२३ : परकीय चलन बाळगण्यावर अनेक निर्बंध असतानाही अनेक घटना समोर येतायत. मुंबई विमानतळावर एका व्यक्तीला परदेशी चलनासह अटक करण्यात आलीय. हा व्यक्ती मुंबईहून दुबईला चालला होता. विमानतळावर तपासणी करताना त्याच्या बॅगेतून तीन कोटी रुपयांचे परदेशी चलन सापडले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) मंगळवारी ही कारवाई केली. सीआयएसएफच्या चौकशीत हा व्यक्ती जास्त प्रमाणात परकीय चलन बाळगण्यासाठीचे कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकला नाही. यानंतर त्याला सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. सीआयएसएफ अधिकारी सदर इसमाची सखोल चौकशी करत आहेत. हे परकीय चलन त्याने कोठून आणले. याबाबत चौकशीअंतीच सर्व स्पष्ट होईल.
घटनेची हकीकत अशी कि, मुंबई विमानतळावर एक इसम मंगळवारी दुबईला जाण्यासाठी दाखल झाला. विमानतळावरील एक्स-रे स्कॅनरमध्ये सुरक्षा तपासणीसाठी त्याने बॅगा टाकल्या. यानंतर स्कॅनरमध्ये जे दिसले ते पाहून सीआयएसएफ अधिकारी चक्रावून गेले. त्याच्या सामानातून एकूण १४,२२,५०० दिरहम, सध्याच्या विनिमय दरानुसार सुमारे तीन कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सदर इसम अमिरातीच्या विमानाने दुबईला जाणार होता.
गेल्या वर्षी एका कुटुंबातील तीन सदस्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून यूएस ४,९७,००० (४.१ कोटी) किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबई एअर इंटेलिजन्स युनिट (एआययु) ने केलेल्या ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली. एका कुटुंबातील तीन भारतीय प्रवासी फ्लाय दुबई फ्लाइट एफ झेड ४४६ ने दुबईला जात असताना त्यांना रोखण्यात आले आणि परदेशी चलनासह पकडण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर