धोनीला सोशल मीडिया वरून धमकावणाऱ्या व्यक्तीला कच्छ मधून अटक

रांची, १२ ऑक्टोंबर २०२०: चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात सोशल मीडियावर अश्लील टीका करणार्‍या व्यक्तीला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवामुळं या माणसाला खूपच धक्का बसला असल्याचं कच्छ पोलिसांनी सांगितलं. त्याच निराशेतून त्यानं महेंद्रसिंग धोनीची पाच वर्षांची मुलगी जीवा बद्दल अपशब्द काढले होते. गुजरात पोलिसांनी या व्यक्तीला सोशल मीडिया कायद्यांतर्गत अटक केली असून लवकरच त्याला रांची पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.

तथापि, हे ऐकून फार आश्चर्य वाटलं की अटक केलेली व्यक्ती अल्पवयीन असून बारावीत शिकत आहे. त्याला मुंद्रा येथील नामना कपया गावातून अटक केली आहे.

गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्ज १५७ धावा करु शकला आणि कोलकाता नाईट रायडर्स १० धावांनी विजयी झाला. यावर नाराज या अल्पवयीन व्यक्तीनं सोशल साईटवर कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला धमकावले आणि त्याच्यावर अश्लिल प्रतिक्रिया दिल्या.

सोशल साइटवर मिळालेल्या या धमकीनंतर रांची पोलिसांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांचीतील फार्म हाऊसची सुरक्षा वाढवत गुन्हा दाखल केला होता. त्याचबरोबर या अश्लील टीकेनंतर संपूर्ण देशभरातून या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा