हैदराबाद, 11 नोव्हेंबर 2021: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या मुलीला धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे. आता पोलिसांचे पथक आरोपीला मुंबईत आणत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनागेश श्रीनिवास अकुबथिनी असे अटक आरोपीचे नाव आहे. ज्याचे वय 23 वर्षे आहे. आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. तो तेथील रहिवासी आहे. त्याने यापूर्वी फूड डिलिव्हरी अॅप्ससाठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केले होते. आरोपी हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. त्याने आयआयटी हैदराबादमधून बीटेक केले आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. आधी पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला. टीम इंडियावर चाहत्यांची नाराजी एवढी होती की काहींनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. कर्णधार विराट कोहली, त्याची मुलगी वामिका यांच्या कुटुंबाला सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात असून अपशब्द वापरले जात आहेत.
कर्णधार विराट कोहलीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यादरम्यान एका व्यक्तीने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीला धमकी दिली. ज्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. इतकेच नाही तर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनेही या धमकीवर आक्षेप घेतला होता. एखाद्याच्या मुलीला किंवा कुटुंबाला अशा प्रकारे टार्गेट करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे इंझमामने म्हटले होते.
त्यानंतर दिल्ली महिला आयोगाने या मुद्द्यावर कारवाई केली. दिल्ली महिला आयोगाने याप्रकरणी नोटीस बजावून पोलिसांची चौकशी केली होती आणि आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती मागवली होती. आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आरोपी रामनागेश श्रीनिवास अकुबथिनी याला अटक केली आहे. त्याला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात येणार आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे