नाशिक, ९ ऑक्टोंबर २०२०: आर्टिलरी सेंटरमध्ये हेरगिरी करणारा संशयित आयएसआय’च्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाला या व्यक्तीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानं तयार करणाऱ्या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती हा माणूस पुरवत होता. ज्याला अटक करण्यात आली आहे तो हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीत कर्मचारी होता.
संशयित आरोपीला सध्या मुंबई एटीएसनं नाशकातून ४ दिवसांपूर्वीच अटक केली होती. फायटर एअर क्राफ्टसह गोपनीय जागांच्या छायाचित्राची माहिती त्यानं पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय’ला पाठवल्याची माहिती मिळाली आहे. संशयिताच्या कॉल रेकॉर्डमधून ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळं त्याला अटक करून १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संशयित इसमाकडून ५ सिमकार्ड आणि ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. मोबाईल आणि सिमकार्ड तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेले आहेत. संशयित कर्मचारी गुणवत्ता- नियंत्रण विभागात होता. काही महिन्यांपूर्वी त्याची प्रक्रिया विभागात बदली करण्यात आली होती. व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात त्यानं आंदोलन केलं होतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे