पुणे/बारामती ५ मार्च २०२६ : सातबारा उताऱ्यावर नोंदी करून देण्याच्या नावाखाली स्वतःला कोतवाल असल्याचे भासवून लाच उकळणाऱ्या एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. आरोपीने चार प्लॉटच्या नोंदीसाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ संपत महानवर (वय ३५) हा गडदरवाडी, पोस्ट खंडोबाची वाडी, ता. बारामती, जि. पुणे येथील रहिवासी असून तो खाजगी इसम आहे.
मात्र त्याने स्वतःला कोतवाल असल्याचे भासवून तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सातबारा नोंदीसाठी लाचेची मागणीतक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून मौजे निंबूत येथे गट क्रमांक ८६/२ मधील प्लॉट क्रमांक ३ येथे त्यांचे सहा गुंठ्यांचे प्लॉट आहेत. भूमिअभिलेख कार्यालय बारामतीमार्फत या जमिनीची मोजणी करून फाळणी करण्यात आली होती. त्यानंतर उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाने तक्रारदारांच्या प्लॉटच्या ७/१२ नोंदी करण्यासाठी तहसीलदार बारामती यांना पत्र दिले. तहसीलदारांनी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी निंबूत येथील तलाठी जयश्री तनपुरे यांना चार प्लॉटच्या सातबारा नोंदी करण्याचे आदेश दिले होते.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदार निंबूत तलाठी कार्यालयात चौकशीसाठी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या आरोपीने स्वतःला कोतवाल असल्याचे सांगत तलाठी जयश्री तनपुरे आणि मंडळ अधिकारी मोहिते यांच्या नावाने प्रत्येकी प्लॉटसाठी ५ हजार रुपये, अशा एकूण २० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार २६ फेब्रुवारी रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई करण्यात आली.
या पडताळणीत आरोपीने तलाठीसाठी ५ ते ६ हजार आणि मंडळ अधिकाऱ्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.३ मार्च रोजी तक्रारदाराने आरोपीशी फोनवर संपर्क साधला असता त्याने “सातबारा नोंद झाली आहे, पेमेंट पाठवा” असा संदेशही व्हॉट्सअॅपवर पाठवला.सापळा कारवाईत रंगेहात अटक करण्यात आली. ४ मार्च २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. बारामती–निरा रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ, निंबूत खंडोबाची वाडी येथे सायंकाळी सुमारे ५.२५ वाजता आरोपीने तक्रारदाराकडून १५ हजार रुपये लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. चौकशीत आरोपी हा प्रत्यक्षात कोतवाल नसून खाजगी इसम असल्याचे उघड झाले.ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केली. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारे एजंट शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : दिनेश वढणे













































