जामनेर, जळगाव १ जुलै २०२४ : जळगावच्या जामनेर तालुक्यातील शहापूर येथील विधवा महिलेच्या डोक्यात दगड टाकून तरुणाने खून केल्याची घटना आज घडली. मयत संगीता पिराजी शिंदे वय ३६ हीचा, आरोपी किरण कोळी तळेगांव अंदाजे वय २६ याने मद्यधुंद अवस्थेत डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडलीय. खुनाचे कारण मात्र समजू शकले नाही सदर आरोपीस जामनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव येथील किरण कोळी हा या महिलेच्या घरी जाऊन सतत वाद घालत असायचा. आज सकाळी महिलेसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात या तरुणाने महिलेच्या डोक्यात दगड टाकून ठार केले आणि तिथून पळून गेला. घराजवळील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्वरित जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून फरार आरोपीस शोध घेऊन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : भानुदास चव्हाण










































