जालना ७ मार्च २०२४ : सासुचा खून करून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना किशोर एम. जैस्वाल यांनी हा निकाल दिलाय. संतोष भिमराव सरोदे, वय ३८ वर्ष रा. रामनगर ता. जि. जालना असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी संतोष सरोदे यास सासुचा खुन केल्या प्रकरणी कलम ३०२ भा.द.वी. मध्ये जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. सोबतच कलम ३०७ भादवी मध्ये पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावलीय.
१ एप्रिल २०२१ रोजी रात्री ९ वाजता प्रकरणातील फिर्यादी कविता संतोष सरोदे रा. रामनगर ता. जि. जालना व त्यांची मयत आई रेशम मोकिंदा कोळे यांच्या घरी असतांना आंघोळीला गरम पाणी टाकण्याच्या कारणावरून आरोपी संतोष याने कोयत्याने दोघींवर जिवे मारण्याच्या उद्देशाने वार करून फिर्यादी कविता हिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला व कविताची आई मयत रेशम हिला जिवे ठार मारले म्हणुन फिर्यादी कविता हिच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन परतुर येथे गुन्हा दाखल होवुन संपुर्ण तपास झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी कविता, प्रत्यक्षदर्शी, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकरी, इतर साक्षीदार तसेच तपासीक अंमलदार रविंद्र ठाकरे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयापुढे सरकारपक्षातर्फे आलेला साक्षीपुरावा व दोन्ही बाजुचा युक्तीवाद लक्षात घेवून जिल्हा व सत्र न्यायाधीश-०३, जालना किशोर एम. जैस्वाल साहेब यांनी आरोपी संतोष भिमराव सरोदे, वय ३८ वर्ष रा. रामनगर ता. जि. जालना यास सासूचा खून केल्या प्रकरणी कलम ३०२ भा.द.वी. मध्ये जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे सश्रम कारावास व कलम ३०७ भादवी मध्ये पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीये. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. जयश्री बी. सोळंके (बाराडे) यांनी काम पाहिले व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी