ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी देणे अनिवार्य

पुणे, ३१ मे, २०२३: जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त भारत सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन नियम जारी केले आहेत, त्यानुसार आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तंबाखूविरोधी चेतावणी दाखवावी लागेल. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ओटीटी वर मजकूर दाखवणाऱ्या प्रकाशकांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तंबाखूविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने हे पाऊल उचलले आहे.

आरोग्य मंत्रालयाने जागतिक तंबाखू विरोधी दिन (31 मे) रोजी ही अधिसूचना जारी केली आहे, त्यानंतर सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंटेंटसह तंबाखूविरोधी चेतावणी प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. विशेष म्हणजे चित्रपटगृहे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या कंटेंटमधे तंबाखूविरोधी जाहिरात दाखवणे अगोदरच बंधनकारक होते. चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी किमान तीस सेकंदांच्या कालावधीची तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी दर्शविली जाते.

नवीन नियमानुसार तंबाखू उत्पादने किंवा त्यांचा वापर दाखवणाऱ्या ऑनलाइन कंटेंट प्रकाशकांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी किमान तीस सेकंद तंबाखूविरोधी आरोग्य जागरूकता दाखवावी. तसेच, ओटीटी प्लॅटफॉर्मना तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रदर्शनाच्या कालावधीत किंवा कार्यक्रमात त्यांचा वापर करण्याच्या कालावधीत स्क्रीनच्या तळाशी तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी देखील एक संदेश म्हणून दाखवावी लागेल.या अधिसूचनेमुळे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी संदेश देणे बंधनकारक केले जाईल जसे आपण चित्रपटगृहांमध्ये आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये दाखविलेल्या चित्रपटांमध्ये पाहतो.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा